



रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सर्वधर्मीय एकोप्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच उपद्रवी कारवाया करणाऱ्या व्यक्तींवर पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रावेरला भेट दिली. यानिमित्त मराठा मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सवाच्या काळातील कायदा व सुव्यवस्था, विसर्जन मिरवणूक, वाहतूक नियोजन, ध्वनीप्रदूषण आणि सामाजिक सलोखा यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना एसपी श्रीकांत धिवरे यांनी प्रत्येक गणेश मंडळासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले. गणेश मंडळांना उत्सवाच्या काळात कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा सण असून तो शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या काळात समाजकंटक किंवा उपद्रवी व्यक्तींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवा, वादग्रस्त संदेश किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रकारांपासून दूर राहावे आणि कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले. रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा २३ सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी बैठकीत दिली. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रावेर पोलीस दल सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले. त्याचबरोबर ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळांनी व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुरळीत व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रावेर शहरात सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्मीय एकोपा कायम राहावा, यासाठी शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, नागरिक आणि विविध शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, नायब तहसीलदार श्री. साळी, पोलीस उपनिरीक्षक सखाराम कांबळे, मनोज महाजन, गटविकास अधिकारी विनोद मेढे, माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, नगरसेवक पद्माकर महाजन, नगरसेवक बंटी महाजन, राजेश शिंदे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच नितीन पाटील, डॉ. सुरेश पाटील, भास्कर महाजन, अशोक शिंदे, उमेश महाजन, मेहमूद शेख, बाळू शिरतुरे, दिलीप कांबळे, सी. एस. पाटील, पंकज वाघ, शेख शफीसर, जमील शेख, अयुब पहेलवान, मंजूर टेलर, शैलेंद्र अग्रवाल, अब्दुल मुत्तलिप यांच्यासह रावेर पोलीस ठाणे हद्दीतील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलीस पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.



