Home Cities अमळनेर गणेशोत्सवात संस्कृती जोपासा ; डीजेपेक्षा पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या : पोलीस अधीक्षक...

गणेशोत्सवात संस्कृती जोपासा ; डीजेपेक्षा पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या : पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे

0
13


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना डीजेच्या कर्णकर्कश दणदणाटाला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे आणि उत्सवाला संस्कृती व शिस्तीची जोड द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस व प्रशासनातील अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी कायदा व सुव्यवस्था, मिरवणूक व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि सामाजिक सलोखा यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी केले. धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही प्रशासनासोबतच गणेश मंडळे आणि नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेश मंडळांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि शांततेचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असेही बैठकीत सांगण्यात आले.

गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावरून अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कोणत्याही अफवेवर अथवा अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता संशयास्पद माहिती तातडीने प्रशासन किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात येणार आहे. मिरवणुकीचे मार्ग, वाहतूक व्यवस्था, सुरक्षेचा बंदोबस्त तसेच गर्दीच्या ठिकाणी आवश्यक पोलीस व्यवस्था याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

“गणेशोत्सव हा आनंदाचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवात शिस्त, शांतता आणि सामाजिक सलोखा राखून प्रशासनाला सहकार्य करा,” असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी केले. गणेश मंडळांनीही प्रशासनाशी समन्वय ठेवून उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस अमळनेरचे पोलीस उपअधीक्षक हितेंद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, लोकनियुक्त नगराध्यक्ष परिक्षित बाविस्कर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound