Home Cities यावल साकळी विकास सोसायटीकडून सरपंच दीपक पाटील यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर 

साकळी विकास सोसायटीकडून सरपंच दीपक पाटील यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर 

0
31


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील साकळी येथे सहकार व राजकीय क्षेत्राला दिशा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. नूतन साकळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाने साकळी गावचे लोकनियुक्त सरपंच तथा संस्थेचे सभासद दीपक नागो पाटील यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. या निर्णयामुळे सरपंच दीपक पाटील यांच्या नेतृत्वाला सहकार क्षेत्रातून मोठे बळ मिळाले असून आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध विकास सहकारी संस्थांकडून एका प्रतिनिधी व्यक्तीच्या नावाचा अधिकृत ठराव मंजूर केला जातो. या प्रतिनिधीला निवडणूक प्रक्रियेत उमेदवार, मतदार, सूचक व अनुमोदक म्हणून महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त होत असल्याने विकास सोसायट्यांच्या या ठरावाला विशेष महत्त्व असते. याच पार्श्वभूमीवर सहकार संस्था प्रशासनाच्या परिपत्रकानुसार दि. २७ रोजी नूतन साकळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव प्रमोद लोधी यांनी आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्थेच्या वतीने एका योग्य सभासदाच्या नावाचा ठराव सादर करण्याची प्रक्रिया सविस्तर मांडली.

या बैठकीदरम्यान संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुनील बाबूलाल नेवे यांनी साकळीचे लोकनियुक्त सरपंच, संस्थेचे सभासद व शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते दीपक नागो पाटील यांच्या नावाचा ठराव करण्याची सूचना मांडली. या सूचनेला संस्थेचे ज्येष्ठ संचालक निंबादास पंडित पाटील यांनी तातडीने अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व संचालकांनी एकमुखाने या प्रस्तावाला सहमती दर्शविल्याने सरपंच दीपक पाटील यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा सचिव प्रमोद लोधी यांनी केली. या विशेष सभेस संस्थेच्या चेअरमन मरबाई सर्फराज तडवी, व्हाईस चेअरमन ईश्वर धोंडू कोळी यांच्यासह संचालक सुभाष भास्कर महाजन, मोहन काशिनाथ बडगुजर, अरुण रामचंद्र खेवलकर, आत्माराम चुडामण तेली, राजू पंडित बडगुजर, तज्ज्ञ संचालक विलास लक्ष्मण पवार, शेख सलीम अब्दुल हक, तसेच संचालिका श्रीमती लिलाबाई भगवान मराठे व आशाबाई रवींद्र बडगुजर प्रमुख उपस्थित होते.

या निवडीनंतर संचालक मंडळातील सदस्यांनी सरपंच दीपक पाटील यांच्या कार्यपद्धतीचा आणि ग्रामविकासातील योगदानाचा गौरव केला. साकळी गावाचे सरपंच म्हणून त्यांनी राबवलेली विविध विकासकामे आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे गावाने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामविकासात सक्रिय असणाऱ्या नेतृत्वावर सहकार क्षेत्राने दाखविलेला हा विश्वास आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून, साकळी परिसरासह संपूर्ण तालुक्याच्या राजकीय व सहकार वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे.

नूतन साकळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विशेष बैठकीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६-३१ साठी साकळीचे सरपंच दीपक नागो पाटील यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ संचालक सुनील नेवे यांनी मांडलेल्या व निंबादास पाटील यांनी अनुमोदलेल्या या प्रस्तावास सर्व संचालकांनी एकमुखाने पाठबळ दिल्याने सहकार क्षेत्रात दीपक पाटील यांच्या नेतृत्वाला नवी ताकद मिळाली आहे.


Protected Content

Play sound