Home Cities जळगाव कावड यात्रेतील ७ वर्षीय प्रबल गवळीच्या मृत्यूची सखोल चौकशी करा ; संतप्त...

कावड यात्रेतील ७ वर्षीय प्रबल गवळीच्या मृत्यूची सखोल चौकशी करा ; संतप्त गवळी समाजाची पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ममुराबाद रोडवरील म्हाळसादेवी मंदिरासमोर कावड यात्रेदरम्यान भरधाव वाहनाच्या धडकेत ७ वर्षीय प्रबल राजू गवळी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने यादव गोल्ला गवळी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या अपघाती मृत्यूची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त समाज बांधवांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन साद केले.

कावड यात्रेदरम्यान ममुराबाद रोडवरील म्हाळसादेवी मंदिरासमोर हा भीषण अपघात झाला होता. भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकल्या प्रबल राजू गवळीचा मृत्यू झाला. अवघ्या सात वर्षांच्या बालकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची केवळ अपघाती घटना म्हणून नोंद न करता संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, वाहनाचा वेग किती होता, चालकाची भूमिका काय होती आणि घटनेपूर्वी व घटनेनंतर नेमक्या कोणत्या परिस्थिती निर्माण झाल्या, याचा तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

अपघातस्थळी तसेच परिसरातील उपलब्ध CCTV फुटेज तातडीने तपासून जतन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या फुटेजसह प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वाहनाची तांत्रिक तपासणी आणि इतर उपलब्ध पुरावे तपासून अपघाताची संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका समाज बांधवांनी मांडली. दरम्यान, ममुराबाद रोडवरील वाहतुकीची वाढती वर्दळ आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता रस्त्यावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. मंदिर व यात्रेच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारणे, रस्त्याच्या कडेला साईड पट्टीची व्यवस्था करणे तसेच वाहनांच्या वेगमर्यादेबाबत स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे आवश्यक असल्याचे समाज बांधवांनी सांगितले.

विशेषतः धार्मिक यात्रा, उत्सव आणि गर्दीच्या काळात या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. भविष्यात एखाद्या कुटुंबावर अशाच प्रकारचे दुःख ओढवू नये, यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी अपघात प्रतिबंधक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देताना यादव गोल्ला गवळी समाज बांधवांनी प्रबल गवळीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ममुराबाद रोडवरील सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारावी, अशी ठाम मागणी केली. या प्रकरणात प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 


Protected Content

Play sound