Home आरोग्य बदलत्या वातावरणामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढला ; नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक –...

बदलत्या वातावरणामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढला ; नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक – नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नितु पाटील

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बदलत्या वातावरणामुळे जळगाव शहरात डोळ्यांच्या संसर्गाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, त्यामध्ये ‘मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिस’च्या रुग्णांचे प्रमाण प्रामुख्याने आढळून येत आहे. सामान्य डोळे येण्यापेक्षा हा संसर्ग अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याने लक्षणे दिसताच वेळ न दवडता नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःहून औषधे किंवा घरगुती उपचार करण्याऐवजी योग्य निदान आणि उपचार घेण्याचे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांनी केले आहे.

मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिस हा प्रामुख्याने ‘अॅडिनोव्हायरस’मुळे होणारा संसर्ग आहे. याशिवाय स्ट्रेप्टोकोकस आणि स्टॅफिलोकोकस या जिवाणूंच्या संसर्गामुळेही हा आजार होऊ शकतो. पावसाळा, दमट हवामान आणि वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य विषाणूंचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा काळात डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण अचानक वाढताना दिसतात. बाधित व्यक्तीच्या डोळ्यातील स्रावाच्या थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्कातून हा संसर्ग पसरू शकतो. संक्रमित व्यक्तीचा टॉवेल, रुमाल किंवा मोबाईल यांसारख्या वस्तू शेअर केल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डोळ्यांचा संसर्ग झालेल्या व्यक्तींनी वैयक्तिक वस्तू इतरांसोबत वापरू नयेत, तसेच हातांची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.

सामान्य कंजंक्टिव्हायटिसमध्ये डोळे लाल होणे, पाणी येणे किंवा पू येणे अशी लक्षणे दिसतात. मात्र, मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसमध्ये डोळ्यांच्या आतील कंजंक्टायव्हा या नाजूक त्वचेवर सूज येऊन फायब्रिन आणि पांढऱ्या रक्तपेशींचा जाड थर किंवा पडदा तयार होतो. हा पडदा डोळ्याच्या अत्यंत संवेदनशील भागाला चिकटलेला असतो. त्यामुळे तो स्वतःहून काढण्याचा किंवा साफ करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. काही वेळा पडदा काढताना डोळ्यातून रक्तस्राव होण्याचीही शक्यता असते. या आजारात डोळे अत्यंत लाल होणे, पापण्यांना मोठी सूज येणे, डोळ्यांतून सतत जाड पिवळसर किंवा पांढरा पू येणे, डोळ्यात काहीतरी टोचत असल्यासारखी तीव्र वेदना होणे आणि प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय डोळ्याच्या आतील बाजूस पांढरट किंवा गर्द रंगाचा पडदा दिसणे हेही महत्त्वाचे लक्षण आहे. ही लक्षणे जाणवताच रुग्णांनी स्वतःहून कोणतेही औषध, विशेषतः डोळ्यांचे ड्रॉप्स, वापरणे टाळावे. चुकीच्या औषधोपचारामुळे संसर्गाची तीव्रता वाढण्याची किंवा डोळ्यांना इतर त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेत्ररोग तज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉ. नितु पाटील यांनी स्पष्ट केले.

मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिस हा संसर्गजन्य आजार असला तरी वेळेवर अचूक निदान आणि योग्य उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसताच विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि घरगुती उपाय स्वतःहून करण्याचे टाळणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी स्वच्छता राखणे, संक्रमित व्यक्तींच्या वैयक्तिक वस्तूंचा वापर टाळणे आणि लक्षणे दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉ. नितु पाटील, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व वासुदेव नेत्रालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound