या आंदोलनात जळगाव शहरातील ढासळलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरून प्रशासनावर तीव्र प्रहार करण्यात आला. वेळेवर आणि पूर्ण दाबाने पाणी न मिळणे, रात्री-अपरात्री सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना इलेक्ट्रिक पंप वापरावे लागणे आणि पूर्वसूचना न देता वेळापत्रक पुढे ढकलणे यामुळे जनता बेजार झाली आहे. मनपा २४ तास पुरेसे पाणी देण्यास असमर्थ असताना वॉटर मीटर बसवून मनमानी पाणीपट्टी वसूल करण्याची तयारी करत असल्याचा आरोप करत, आधी २४ तास पाणी देण्याची क्षमता सिद्ध करा, मगच मीटर बसवा, अशी भूमिका मांडण्यात आली.
शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि मक्तेदारांची मुजोरी यावरूनही आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रत्येक प्रभागात रस्ते दुरुस्तीसाठी मक्तेदारांना प्रत्येकी १० लाखांची कामे देऊनही कामे केली जात नसून, आयोजिलेल्या बैठकांनाही मक्तेदार गैरहजर राहत असल्याने ही प्रशासनाचीच अवहेलना असल्याचा घणाघात करण्यात आला. अशा कामचुकार मक्तेदारांचे कंत्राट रद्द करून सक्षम कंत्राटदारांमार्फत रस्ते दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावरील दोन वर्षांपासून मंजूर असलेले सौर पथदिवे त्वरित कार्यान्वित करणे आणि बंद पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी लावून धरण्यात आली.
कचऱ्याचे साचलेले ढीग, त्यामुळे पसरणारी डेंग्यू-मलेरियाची साथ आणि मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्यांवर आणि कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात अपयशी ठरलेल्या मक्तेदारावर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. तसेच शिवाजीनगर उड्डाणपुलावरील खड्डे तातडीने बुजवून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवणे, स्थानिक रहिवाशांसाठी लोखंडी शिडी उभारणे आणि मेहरुण शिवारातील स्मशानभूमीत आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रमुख मुद्दे या आंदोलनात मांडण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जळगाव महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार आंदोलन करत १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, नागरी समस्या न सुटल्यास मनपा मुख्यालयाला कुलूप लावण्याचा आक्रमक इशारा दिला आहे.
या आंदोलनात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, प्रदेश चिटणीस प्रतिभा शिरसाट, विकास पवार, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, माजी नगरसेवक राजु मोरे, माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी, माजी अध्यक्ष रिंकू चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, प्रा. जयप्रकाश महाडिक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे यांच्यासह गणेश पाटील, सुहास चौधरी, आकाश हिवाळे, चेतन पवार, अकबर खान पैलवान, नईम खाटीक, विशाल देशमुख, कुंदन सूर्यवंशी, ललित नारखेडे, गणेश हाटकर, कुणाल हाटकर, राहुल टोके, स्नेहा भिलारे, रजना सोनवणे, वझला तायडे, लक्ष्मी सोनवणे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.