भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ डेंटल असोसिएशनला इंदूर येथील ब्रिलियंट कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
ब्रिलियंट कन्व्हेंशन सेंटर, इंदूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये, इंडियन डेंटल असोसिएशन,(आयडीए) भुसावळ शाखेला सन्मानित करण्यात आले. इंडियन डेंटल अससोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपक मखिजानी यांच्या हस्ते इंडियन डेंटल असोसिएशन भुसावळ शाखेचे अध्यक्ष डॉ. विजय ढाके, सचिव डॉ. पराग पाटील, व कोषाध्यक्ष डॉ. गणेश चौधरी यांनी हा पुरस्कार स्विकारला. वर्षभरात या शाखेने डॉ.विजय ढाके यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमांचे यशस्वीरीत्या आयोजन केले. विभागातील खेड्यापाड्यांत अनेक शिबिरे घेऊन मौखिक आरोग्य राखण्यासाठी जनजागृती अभियान राबवले. यासोबत भुसावळ परिसरात ब्राईट स्माईल ब्राईट फ्युचर हा राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम यशस्वी केला. यामुळे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.