Home प्रशासन शिरसाळा ग्रामसभेत ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक ; प्रशासकाला धरले धारेवर 

शिरसाळा ग्रामसभेत ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक ; प्रशासकाला धरले धारेवर 

0
17

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाळा येथे २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित ग्रामसभेत विविध प्रलंबित प्रश्नांवरून ग्रामस्थांचा संयम सुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. गावातील मूलभूत सुविधा, अनियमित पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, रस्ते व गटारींची समस्या तसेच पुलाच्या निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांनी प्रशासकाला जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्याने काही काळ ग्रामसभेतील वातावरण चांगलेच तापले.

ग्रामसभेला गावातील आजी-माजी पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र, इतर संबंधित प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्यानेही ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून आली. गावातील अनेक समस्या यापूर्वीच्या ग्रामसभांमध्ये मांडूनही त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. पाणीपुरवठा अनियमित होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांचा वापर करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही शौचालयांवर पाण्याच्या टाक्याही नसल्याचा मुद्दा यापूर्वी ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अद्याप टाक्या बसविण्यात का आल्या नाहीत, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

सार्वजनिक शौचालयांमध्ये अस्वच्छता पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या मूलभूत आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे, असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला. गावातील रस्ते आणि गटारींची अवस्थाही चिंताजनक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मुख्य चौकात गटारीचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

काही दिवसांपूर्वी मागासवर्गीय वस्तीतून जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार ग्रामस्थांनी यापूर्वीच केली होती. मात्र, काम थातूरमातूर पद्धतीने करण्यात आल्याने पुलाच्या आजूबाजूचा भराव वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का, असा थेट सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामसभेत प्रश्न मांडताना ग्रामस्थांनी केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. ‘फक्त आश्वासन नको, काम दिसले पाहिजे,’ अशी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने प्रश्न ऐकून घेण्यापेक्षा ते प्रत्यक्ष सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली. वारंवार समस्या मांडूनही त्यांची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसून आले.

प्रश्नांची वाढती सरबत्ती आणि ग्रामस्थांचा संताप यामुळे काही काळ ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकशाही पद्धतीने गावाच्या विकासावर चर्चा करून समस्या सोडविणे हा ग्रामसभेचा मुख्य उद्देश असताना आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. आता ग्रामसभेत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांवर प्रशासन ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कारवाई कधी करणार, याकडे शिरसाळावासीयांचे लक्ष लागले आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटारी आणि पुलाच्या कामासह विविध प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound