Home प्रशासन बोदवड शहरात गुटखाबंदीची उघडपणे पायमल्ली ; सरकारी कार्यालयांबाहेर आणि गल्लीबोळात खुलेआम विक्री

बोदवड शहरात गुटखाबंदीची उघडपणे पायमल्ली ; सरकारी कार्यालयांबाहेर आणि गल्लीबोळात खुलेआम विक्री

0
15

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही बोदवड शहरासह तालुक्यात या बंदीची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील गल्लीबोळ, गर्दीची ठिकाणे, पानटपऱ्या तसेच सरकारी कार्यालयांच्या परिसरात बंदी असलेले पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अठरा तारखेला शेलवळ फाट्यावर वाहनाचा अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याचे प्रकरण समोर आल्याने तालुक्यातील अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर शहर आणि तालुक्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री व पुरवठा नेमका कोणाच्या माध्यमातून सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाकडून गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी कठोर आदेश, तपासणी आणि छापेमारीच्या मोहिमा राबविल्या जातात. मात्र बोदवड शहरातील परिस्थिती पाहता या कारवाईचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही पानटपऱ्या, गल्लीबोळातील किराणा दुकाने आणि हातगाड्यांवर बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ सहज मिळत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी कार्यालयांच्या बाहेरील परिसरातही अशा पदार्थांची विक्री होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुटख्याच्या सहज उपलब्धतेमुळे अल्पवयीन मुले, युवक आणि विद्यार्थी या व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता वाढत असल्याने पालक आणि सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गुटख्यामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे शासनाने अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र बंदी असूनही विक्री सुरू राहिल्यास या नियमाचा उद्देशच निष्फळ ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. संबंधित अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांनी केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता गुटख्याचा पुरवठा करणाऱ्या मुख्य व्यक्ती आणि अवैध साखळीपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

काही ठिकाणी कारवाई केली जात असली तरी ती पुरेशी आणि सातत्यपूर्ण नसल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे बोदवड शहर आणि तालुक्यात विशेष गुटखा विरोधी मोहीम राबवून नियमित तपासणी, छापेमारी आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर युवकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बोदवड शहरात गुटखाबंदीची अंमलबजावणी अधिक कठोरपणे होणार का, अवैध पुरवठा साखळीवर कारवाई होणार का आणि खुलेआम विक्रीला आळा बसणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून गुटखा विक्रीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound