Home Cities यावल फैजपूरमध्ये महिला नेतृत्वाचा गौरव; उद्योजकतेला प्रोत्साहन देत सक्षमीकरणावर सकारात्मक चर्चा

फैजपूरमध्ये महिला नेतृत्वाचा गौरव; उद्योजकतेला प्रोत्साहन देत सक्षमीकरणावर सकारात्मक चर्चा

0
21

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील महिला नेतृत्व, उद्योजकता आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणारी सदिच्छा भेट १८ ऑगस्ट रोजी यावल रोडवरील जे. टी. महाजन पॉलिटेक्निक शेजारील बिस्किट फॅक्टरी येथे पार पडली. सौ. दामिनी दीपक सरोदे यांच्या उद्योगस्थळी महाराष्ट्र राज्य महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार सौ. चित्राताई वाघ आणि आमदार अमोल जावळे यांची मान्यवर महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान महिला सक्षमीकरण, उद्योजकतेला प्रोत्साहन, महिलांचे नेतृत्व आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. महिलांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच नव्हे, तर उद्योग-व्यवसाय, प्रशासन आणि विविध कार्यक्षेत्रांमध्ये आत्मविश्वासाने पुढे येऊन नेतृत्वाची धुरा स्वीकारावी, यावर उपस्थितांनी भर दिला. उद्योगाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली. महिलांमध्ये असलेल्या क्षमता आणि कौशल्यांना योग्य संधी मिळाल्यास त्या कुटुंबासोबतच समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असा सूर चर्चेतून उमटला.

यावेळी फैजपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. दामिनी पवन सराफ, नगरसेविका तथा पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती सौ. जयश्री नरेंद्र चौधरी, फैजपूर मंडळ अध्यक्षा अनुराधा परदेशी, फैजपूर मंडळ शहराध्यक्षा सौ. मृणाल राणे, सौ. भारती पाटील, सौ. रेखाताई वर्मा आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.महिलांनी विविध क्षेत्रांत सक्रिय सहभाग नोंदवून समाजाच्या विकासात आपली भूमिका अधिक प्रभावी करावी, असा प्रेरणादायी संदेश या भेटीतून देण्यात आला. विशेषतः उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याबरोबरच इतर महिलांसाठीही रोजगार आणि संधी निर्माण करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.

महिला नेतृत्व, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारी ही भेट उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासोबतच त्यांना प्रोत्साहन आणि नवी दिशा देण्याच्या दृष्टीने या सदिच्छा भेटीचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले. याप्रसंगी सागर होले, बंटी मडवले, पवन सराफ, सुरज गुजराती, गोटू भारंबे, उमेश बेंडाळे, पप्पू जाधव, मनोज चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound