मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथील विद्यार्थी वात्सल्य गजानन काटे याने उल्लेखनीय यश संपादन करत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वात्सल्य काटे याने शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २१८ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशातून नियमित अभ्यास, सातत्य, जिद्द आणि मेहनतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. शाळेतून या परीक्षेसाठी एकूण सहा विद्यार्थी पात्र ठरले होते. यामध्ये वात्सल्य गजानन काटे याच्यासह ओवी सतीश सुशिर, गणाधीश अनिल मिरगे, शंतनु प्रदीप मिसाळ, प्राची अरविंद शेगोकार आणि समर्थ मोहन मराठे यांचा समावेश आहे. वात्सल्यच्या यशामागे त्याची अभ्यासातील सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्द महत्त्वाची ठरली. तसेच वर्गशिक्षक मनोज राठोड, श्रीमती आशा कोळी आणि श्रीमती वंदना भालशंकर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. शिक्षकांनी घेतलेले परिश्रम, विद्यार्थ्याचा नियमित अभ्यास आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.

वात्सल्यने मिळविलेल्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन ॲड. रोहिणी ताई खडसे, व्हाईस चेअरमन नारायण चौधरी, स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ महाजन, मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे तसेच सर्व शिक्षकवृंदाने त्याचे अभिनंदन केले. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. वात्सल्य काटे याने मिळविलेले तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे यश हे त्याच्या मेहनतीला मिळालेले फलित असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही ते निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील सहा विद्यार्थी पात्र ठरल्याने शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीचेही कौतुक होत आहे.



