Home पर्यावरण स्वातंत्र्य दिनी पिचर्डेत ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’ उपक्रम ; २०० आंबा रोपांची लागवड

स्वातंत्र्य दिनी पिचर्डेत ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’ उपक्रम ; २०० आंबा रोपांची लागवड

0
21

भडगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कृषि विज्ञान केंद्र, जळगाव, शेतकरी-शास्त्रज्ञ मंच आणि श्री गिरणाकाठ केळी शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिचर्डे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘शेतकऱ्यासोबत स्वातंत्र्य दिन’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थी, पालक, शेतकरी, शिक्षक, शास्त्रज्ञ तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक शेतीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. यावेळी उपस्थितांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा जयघोष करत देशसेवा, शेती आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. देशसेवेतून निवृत्त झालेले माजी सैनिक शिवाजी बोरसे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच प्रगतिशील शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या आणि कृषि विज्ञान केंद्र, जळगावला उत्कृष्ट केव्हीके पुरस्कार मिळवून देण्यात योगदान देणारे उद्यानविद्या विषयातील शास्त्रज्ञ प्रा. किरण जाधव यांचा केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यानंतर शाळेच्या परिसरात तब्बल २०० आंबा वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वृक्षाला संबंधित विद्यार्थ्याचे नाव आणि त्याच्या वडिलांचे नाव असलेली वृक्षपाटी लावण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ वृक्षारोपणाचा अनुभव मिळाला नाही, तर भविष्यात त्या झाडाची निगा राखण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांशी भावनिक नाते निर्माण करून पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाला कृषि विज्ञान केंद्र, जळगावचे उद्यानविद्या विषयातील शास्त्रज्ञ प्रा. किरण जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दीपक महाजन, मुख्याध्यापक माधव पाटील, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे भडगाव तालुका कार्याध्यक्ष विनोद बोरसे, परादीप फॉस्फेटचे योगेश महाजन, सरपंच किरण वैराळे, पोलीस पाटील श्रीमती चेतना पाटील, विकासोचे चेअरमन श्रीराम रामदास पाटील, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक बोरसे यांच्यासह सर्व संचालक, ग्रामस्थ, केळी उत्पादक शेतकरी, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विद्यार्थ्यांसह पालक आणि शेतकऱ्यांना केळी फळाचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व, त्यातील पोषक घटक तसेच दैनंदिन आहारातील केळीच्या विविध उपयोगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रा. किरण जाधव यांनी केले. शेती, विज्ञान आणि पर्यावरण यांचा समतोल साधल्यास ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला मोठी चालना मिळू शकते, असा संदेशही त्यांनी दिला.

‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जबाबदारी निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी लावलेली ही २०० आंब्याची झाडे भविष्यात शाळेचा परिसर हिरवाईने नटविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा जिवंत संदेश देणार आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्ती, शेतकरी, विज्ञान आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

पिचर्डे येथील या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्षसंवर्धनाची चळवळ रुजविण्याचा प्रयत्न झाला असून, ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’ ही संकल्पना भविष्यात शाळेच्या हिरवाईसाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound