जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आडगाव (ता. एरंडोल) येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते धनराज नवल अहिरे आणि ग्रामपंचायत सदस्या वैशाली धनराज अहिरे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी ग्रामपंचायतीतील विविध कामांमध्ये कथित अनियमितता, निकृष्ट दर्जाची विकासकामे, पाणीपुरवठा योजनेतील प्रश्न तसेच आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा विविध मागण्या त्यांनी जिल्हा परिषदे समोर शुक्रवार, १४ ऑगस्टपासून आमरण उपोषण पुकारले आहे.
आडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील केंद्राजवळील विहिरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई करून त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ३.७५ कोटी रुपये खर्च करूनही गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या योजनेच्या कामाची संपूर्ण चौकशी करून निधीचा विनियोग, कामाची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची स्थिती तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या रकमेसंदर्भातही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वसूल झालेली रक्कम नियमानुसार बँकेत जमा करण्यात आली आहे का, याची तपासणी करून आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
गावातील विविध विकासकामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत संबंधित कामांची गुणवत्ता तपासावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीतील कथित ई-टेंडर घोटाळ्याची चौकशी करून त्यामध्ये अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
याशिवाय, १४वा वित्त आयोग तसेच अन्य निधीतून करण्यात आलेल्या कामांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष काम न करता दोन वेळा पैसे काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, भोकर अंगणवाडीच्या दुरुस्तीच्या कामातही आर्थिक अनियमितता झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. या सर्व बाबींची कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपोषणकर्त्यांनी यापूर्वी विविध तारखांना प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. संबंधित प्रकरणांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी, दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी आणि गावातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका धनराज अहिरे व वैशाली अहिरे यांनी घेतली आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याप्रसंगी नामदेव पाटील, विश्वास पाटील, महादू माळी, देविदास पवार, अनिल पाटील, गुलाब माळी, नामदेव पाटील, संतोष कोळी, रवींद्र पाटील, देविदास पाटील आदी उपस्थित आहेत.



