Home Cities जळगाव ‘स्वच्छ आणि हरित जळगाव’साठी महासंकल्प; पर्यावरण महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

‘स्वच्छ आणि हरित जळगाव’साठी महासंकल्प; पर्यावरण महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

0
14

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वच्छ, सुंदर आणि हरित जळगाव शहराच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका, नाशिक येथील हिरवांकुर संस्था आणि जळगावच्या ग्रीन सिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ बुधवार, १२ ऑगस्ट रोजी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात करण्यात आला. महोत्सवाच्या निमित्ताने शहरातून जनजागृतीसाठी सायकल रॅली आणि वृक्षदिंडी काढण्यात आली.

पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित शहराचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “हा महोत्सव केवळ एक प्रदर्शन नसून पर्यावरण संवर्धनाची एक मोठी चळवळ आहे. जळगाव शहर स्वच्छ आणि हरित राहावे यासाठी महापालिकेचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत सर्व जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी शहरात पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी भव्य सायकल रॅली काढण्यात आली. त्यासोबतच वृक्षदिंडीच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या उपक्रमांमध्ये नागरिक तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.

१२ ते १६ ऑगस्टदरम्यान नूतन मराठा महाविद्यालयात भरविण्यात आलेले पर्यावरण प्रदर्शन सर्व नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. पर्यावरणाशी संबंधित विविध विषयांची माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार असून, नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जळगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी स्पष्ट केले. इंदूर शहराची देशातील ‘सर्वात स्वच्छ शहर’ अशी ओळख निर्माण झाली आहे. त्याच धर्तीवर जळगाव शहराचीही स्वच्छ आणि हरित शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरापासून आणि परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. कचरा योग्य ठिकाणी टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्षांचे संवर्धन करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश या महोत्सवातून देण्यात येत आहे.

या पर्यावरण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर नाशिक येथील हिरवांकुर फाउंडेशनचे प्रमुख निलयबाबू जैन शाह, जळगाव ग्रीन सिटीचे संचालक विजयकुमार वाणी, नलिनी शाह, कांचन वाणी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, नगरसेविका सुचिता हाडा, नगरसेविका उज्वला वेंडाळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, विष्णू भंगाळे तसेच महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी आदी उपस्थित होते.

पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कुटुंब आणि समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

जळगाव शहरातील नागरिकांनी पर्यावरण महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि स्वच्छता व हरित शहराच्या निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापालिका, हिरवांकुर संस्था आणि ग्रीन सिटी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound