Home Cities जळगाव पथविक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन; ३१ ऑगस्टला धरणे आंदोलनाचा इशारा

पथविक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन; ३१ ऑगस्टला धरणे आंदोलनाचा इशारा

0
15

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पथविक्रेते, फेरीवाले, फळ व भाजीविक्रेत्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रशासन व अतिक्रमण विभागाकडून वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे पथविक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पथविक्रेत्यांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना सन्मानजनक रोजगाराची हमी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील अनेक पथविक्रेते व फेरीवाले रस्त्याच्या कडेला भाजीपाला, फळे आणि इतर वस्तूंची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मात्र अतिक्रमण विभाग आणि प्रशासनाच्या कारवाईदरम्यान त्यांचा माल जप्त करणे अथवा नासधूस होत असल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीने म्हटले आहे. वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे पथविक्रेत्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचा दावाही आंदोलकांनी केला.

बदलापूर येथील २८ वर्षीय विशाल दाते या तरुणाच्या आत्महत्येचा संदर्भ देत आंदोलकांनी पथविक्रेत्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. प्रशासनाच्या कारवाईमुळेच दाते यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आरोपांबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका मात्र समोर आलेली नाही.

पथविक्रेता अधिनियम २०१४ आणि महाराष्ट्र पथविक्रेता नियम २०१६ यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने केली. पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण, टाउन व्हेंडिंग कमिटीची (TVC) स्थापना आणि आवश्यक योजना अंतिम करून त्यानुसार पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी अधिकृत व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

भारतीय संविधानातील अनुच्छेद १९(१)(ग) अंतर्गत व्यवसाय करण्याच्या अधिकाराचा संदर्भ देत पथविक्रेत्यांना सन्मानजनक उपजीविकेपासून वंचित ठेवू नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. तसेच न्यायालयीन निर्देश आणि पथविक्रेता कायद्याच्या तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष सुनील देहडे आणि जिल्हा सचिव खुशाल सोनवणे यांनी केले. आंदोलनादरम्यान पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये विशाल दाते यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसह भाजपा नगरसेवक संभाजी शिंदे आणि नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दाते यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली.

राज्यात पथविक्रेता अधिनियम २०१४ आणि महाराष्ट्र नियम २०१६ यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, ज्या पथविक्रेत्यांचे अद्याप सर्वेक्षण झालेले नाही त्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि पात्र पथविक्रेत्यांना व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. पथविक्रेत्यांच्या घटनात्मक व कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करून त्यांना सन्मानपूर्वक उपजीविका करता यावी, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे आंदोलकांनी म्हटले.

आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रुषी भारसके आणि शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी हे निवेदन प्रशासनाकडे सुपूर्द केले.

या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, पथविक्रेत्यांचे कायदेशीर सल्लागार अॅड. आनंद कोचुरे, पथविक्रेता प्रमुख विनोद निकम यांच्यासह मल्हारी सरदार, रमेश थाटे, दिनकर भालेराव, मधुकर अहिरे, त्र्यंबक सोनवणे, अमजद रंगरेज, आनंदराव निकम, कॉम्रेड सुधाकर, तबन ह्याळिंगे, रवींद्र बाविस्कर, डॉ. शाकीर शेख, महेंद्र केदारे, कैलास म्हसाने, शालिग्राम सोनवणे, लंकापती भालेराव, महेंद्र साळवे, प्रभाकर मोरे, अंभोरे आदी पदाधिकारी व पथविक्रेते उपस्थित होते.

पथविक्रेत्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीने दिला आहे. ३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर मंत्रालयावर लाखो पथविक्रेत्यांचा विशाल महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्रभारी सुमित्र अहिरे यांनी दिला.


Protected Content

Play sound