Home धर्म-समाज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात रावेरमध्ये एल्गार! हजारोंचा तहसीलवर धडक मोर्चा

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात रावेरमध्ये एल्गार! हजारोंचा तहसीलवर धडक मोर्चा

0
10

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या १३ टक्के संविधानिक व विधिगत आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी रावेरमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो समाजबांधवांच्या सहभागामुळे रावेर शहरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चानंतर तहसीलदार दीपा जेढे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रावेर शहरातील छोरीया मार्केट येथून या मोर्चाला सुरुवात झाली. महिला, युवती, युवक, नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. हातात विविध मागण्यांचे फलक घेत आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अनुसूचित जातींच्या आरक्षणात कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये, अशी ठाम भूमिका मोर्चेकऱ्यांनी मांडली.

अनुसूचित जातींसाठी असलेले १३ टक्के आरक्षण हे संविधानिक आणि विधिगत अधिकार असल्याचे सांगत विद्यमान आरक्षणाचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरक्षणाच्या हक्काला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचू नये आणि उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यात आली.

मोर्चादरम्यान विविध विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे महत्त्व, संविधानिक हक्क, सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर वक्त्यांनी आपली भूमिका मांडली. आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाने एकजूट कायम ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

मोर्चानंतर तहसील कार्यालयात तहसीलदार दीपा जेढे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे विद्यमान स्वरूप अबाधित ठेवावे, उपवर्गीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा आणि आरक्षणाच्या संविधानिक संरक्षणाची हमी कायम ठेवावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

या मोर्चात आनंद बाविस्कर, दिलीप कांबळे, उमेश गाडे, प्रदीप सपकाळे, ॲड. योगेश गजरे, संघरक्षक तायडे, नगरसेवक पिंटू वाघ, प्रशांत गाढे, निलेश नन्नवरे, बाळू शिरतुरे, आत्माराम तायडे, मनोहर तायडे, सावंत मेढ, महेश तायडे, विजय भोसले, ॲड. दीपक तायडे, विजय अवसरमल, विनोद मोरे, महेंद्र कोचुरे, राजेंद्र काळे, साहेबराव वानखेडे, रवी तायडे, ॲड. आनंद वाघोदे, संघरत्न दामोदर, सदाशिव निकम, रवींद्र रायपुरे, राहुल गाडे आणि चांगो भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले.


Protected Content

Play sound