Home धर्म-समाज रसलपूर आश्रमशाळेत आदिवासी संस्कृतीचा जागर! जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

रसलपूर आश्रमशाळेत आदिवासी संस्कृतीचा जागर! जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

0
15

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनानिमित्त रसलपूर येथील कै. पा. तो. पाटील शिक्षण संस्था, रावेरद्वारा संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरी, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आदिवासी गीत आणि पारंपरिक नृत्याच्या सादरीकरणामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गावातून काढलेल्या प्रभात फेरीने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर केला. प्रभात फेरीनंतर आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आणि स्वातंत्र्यलढ्यातील महानायक वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शालेय परीक्षेत इयत्ता दहावीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. अशोकजी शहाणे, मंदार पाटील, मुख्याध्यापक बाळू महाजन, प्राथमिक मुख्याध्यापक प्रदीप पाटील तसेच शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारी विविध आदिवासी गीते सादर केली. तसेच पारंपरिक वेशभूषेत सादर करण्यात आलेल्या आदिवासी नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

जागतिक आदिवासी दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, कला आणि इतिहास यांचे जतन करण्याबरोबरच नव्या पिढीला आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून देण्याचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदार पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक शहाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरलाल पाटील यांनी केले. आभार राहुल पाटील यांनी मानले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound