जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मेहरूण, जळगाव येथे भारत सरकारच्या MY Bharat प्लॅटफॉर्मअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त युवा अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देत व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात फरहान शेख सर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या नशायुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचा, व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी समाजात जनजागृती करण्याचा तसेच निरोगी आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नशेचे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी शक्ती असून, तिचे भविष्य निरोगी आणि सक्षम असणे आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि विविध सकारात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमास बरकत सर, जावेद सर, मेहरुन्निसा मिस, कौसर सर, नूरजहां मिस, रिफत मिस यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच आपल्या कुटुंबीय, मित्र आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन केले.

‘नशेला म्हणा नाही, निरोगी जीवनाला म्हणा हो’ हा प्रभावी संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शपथेमुळे व्यसनमुक्त समाजनिर्मितीच्या दिशेने जनजागृतीला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल इकरा शाहीनचे प्राचार्य रियाज शाह सर, सुपरवायझर जाकिर शेख सर, इकरा एज्युकेशन सोसायटीचे सदर डॉ. अब्दुल करीम साहेब आणि सेक्रेटरी एजाज अहमद मलिक साहेब यांनी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



