जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । युवकांमधील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयांपासून गाव व वॉर्ड पातळीपर्यंत जनजागृती, समुपदेशन, क्रीडा आणि कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, ‘माय भारत’चे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ‘प्रोटेक्ट, प्रिव्हेंट, रिकव्हर’ या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. पालक संवाद, समुपदेशन, डिजिटल डिटॉक्स, करिअर मार्गदर्शन, योग, क्रीडा, वाचन चळवळ, कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दर महिन्याला चार रविवार विविध उपक्रमांसाठी निश्चित करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक गावात ‘माय भारत युवा क्लब’ स्थापन करून युवकांना सकारात्मक उपक्रमांशी जोडले जाणार आहे. तसेच व्यसनाधीन युवकांना समुपदेशन, कौशल्य विकास व पुनर्वसनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे.
अमली पदार्थांविरोधातील पोलिसांची कारवाईही तीव्र करण्यात आली असून, संशयित ठिकाणे, कुरिअर, टपाल व्यवस्था आणि प्रवासी बसची तपासणी केली जात आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘मिशन राईज’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रतिबंध, जनजागृती, उपचार, पुनर्वसन आणि कारवाईच्या माध्यमातून नशामुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.



