Home क्राईम नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

0
12

नांदुरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील इसापूर येथे शेताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा नदीत वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फुलकराम जानकीराम काळे (वय ५०) हे शेतात पाणी गेले आहे का याची पाहणी करत असताना नदीपात्रात पाय घसरून प्रवाहात वाहून गेले. या घटनेनंतर ग्रामस्थ, ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्रभर शोधमोहीम राबविली. अखेर शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह ज्ञानगंगा नदीपात्रात आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फुलकराम काळे हे शेतातील परिस्थिती पाहण्यासाठी गेले होते. परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला आलेल्या पाण्याचा अंदाज घेत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. त्यानंतर ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकही मदतकार्यात सहभागी झाले. जलंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) सुनील देव यांच्या मार्गदर्शनाखाली नदीपात्रात आणि परिसरात सखोल शोधमोहीम राबविण्यात आली. सलग सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर १ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७ वाजता ज्ञानगंगा नदीच्या काठावर फुलकराम काळे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला.

या शोधमोहिमेत ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निबोळकर, आश्विन फेरण, कृष्णा वसोकार आणि विष्णू धांडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच सहदेव काळे, रामेश्वर काळे, गजानन काळे, अमोल काळे, मधुसूदन पुंडकर आणि गजानन उमाळे यांनीही शोधकार्यामध्ये मोलाचे सहकार्य केले. या दुर्दैवी घटनेमुळे इसापूर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी फुलकराम काळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. पावसाळ्यात नदी-नाले आणि पूरग्रस्त भागात जाताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound