सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सावदा येथील श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल आणि श्री पीएमश्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत आकर्षक दिंडी काढत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या दिंडीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी, संत यांसह विविध पारंपरिक रूपे साकारली. काही विद्यार्थ्यांनी डोक्यावर कळस घेतला होता, तर काहींनी धार्मिक ग्रंथ आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती हातात घेऊन सहभागी होत भक्तीमय वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषा, आकर्षक साजशृंगार आणि शिस्तबद्ध सहभागामुळे दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. दिंडीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत विठ्ठल मंदिर, गांधी चौक परिसरात प्रवेश केला. येथे विद्यार्थ्यांनी लेझीम, पावली यांसारखे पारंपरिक खेळ सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सावदा नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील, शिक्षण सभापती सचिन चुडामण बऱ्हाटे, नगरसेवक विशाल भागवल सोनवणे, नगरसेविका सौ. रेखा राजेश वानखेडे, नगरसेविका कु. सिमरन राजेश वानखेडे, नगरसेविका सौ. रंजना जितेंद्र भारंबे तसेच विजया कुशल जावळे उपस्थित होत्या. माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. दिंडी संपल्यानंतर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत परतले आणि नियमित शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. जी. भालेराव, एमश्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता ठोंबरे तसेच दोन्ही शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



