Home धर्म-समाज फैजपूरमध्ये ३० जुलैपासून भव्य संगीतमय श्रीराम कथा महोत्सव 

फैजपूरमध्ये ३० जुलैपासून भव्य संगीतमय श्रीराम कथा महोत्सव 

0
13

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुरु पौर्णिमा उत्सव तसेच ब्रह्मचारी महंत घनःश्यामदासजी महाराज यांच्या आठव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून फैजपूर येथील श्री खंडोबा वाडी देवस्थान येथे ३० जुलैपासून भव्य संगीतमय श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांसाठी हा भक्तीमय पर्वणीचा उत्सव ठरणार आहे.

या धार्मिक महोत्सवाची सुरुवात गुरुवार, दि. ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजता भव्य कलश यात्रेने होणार आहे. त्यानंतर सायंकाळी संगीतमय श्रीराम कथेचा शुभारंभ करण्यात येईल. दि. ५ ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून, युवा कीर्तनकार ह.भ.प. श्री भरत महाराज मेहसवाडीकर हे आपल्या ओघवत्या शैलीत श्रीराम चरित्राचे निरूपण करणार आहेत.

महोत्सवाची सांगता दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी संतांच्या आशीर्वचनांनी होणार आहे. त्यानंतर ह.भ.प. योगी दत्तानाथ महाराज यांचे कल्याचे कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन तसेच विविध संत-महंतांच्या पावन आशीर्वचनांनी धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. या निमित्ताने परिसरात भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाचे आयोजन परमपूज्य श्री १००८ महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तमदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यांचे कृपापात्र पुजारी राम मनोहरदासजी महाराज तसेच समस्त फैजपूर परिसरातील भक्तगण यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम साकारला जात आहे. कार्यक्रमाचे व्यवस्थापन परमपूज्य श्री १०८ महामंडलेश्वर पवनकुमार दास महाराज यांच्या आदेशानुसार करण्यात येत आहे.

धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या श्रीराम कथा महोत्सवाला परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीराम कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून श्रीरामांच्या आदर्श जीवनमूल्यांचा आणि भारतीय संस्कृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound