चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह तब्बल ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नरवाडे ग्रामपंचायतीसमोरील नाल्याजवळील सार्वजनिक रस्त्यावर विशेष पाळत ठेवण्यात आली होती. यावेळी एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर संशयास्पदरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे आवश्यक परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी विना क्रमांकाचा सोनालिका ट्रॅक्टर (अंदाजे किंमत ₹५ लाख), लोखंडी ट्रॉली (₹१.५० लाख) आणि एक ब्रास अवैध वाळू (₹६ हजार) असा एकूण ₹६.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेले गौण खनिज विनापरवाना वाहून नेले जात असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी शुभम भगवान सोनवणे (वय २४, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सुटकार, ता. चोपडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार पंकज रमाकांत ठाकूर यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र साळुंखे करीत असून, अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



