मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये वर्ग-४ कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य लघू वेतन सरकारी कर्मचारी संघटना, जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश चौधरी यांना देण्यात आले.
निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, आरोग्य विभागातील वर्ग-४ कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी रुग्णसेवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असून स्वच्छता, वॉर्ड सेवा, रुग्ण वाहतूक तसेच इतर दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश चौधरी यांनी निवेदन स्वीकारून शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी प्रशासकीय अधिकारी श्री. अमृतकर, लिनन स्टोअर कीपर श्री. विलास वळवी, अधीक्षक श्री. हबाळकर तसेच जिल्हास्तरीय वर्ग-४ टेबल प्रमुख पूजा मॅडम यांना सीएस दालनात बोलावून या विषयावर सकारात्मक चर्चा केली. रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य लघू वेतन सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप काळे, कार्याध्यक्ष किशोर धनगर, जिल्हा सदस्य पराग सरोदे, रोहन भोई, भरत पाटील, मोहन हटकर, रवींद्र सोनवणे, हरीश येवले, गुणीदास पाटील, प्रदीप पारधी, विनोद मोरे, रामचंद्र तागवाले तसेच महिला पदाधिकारी उमा सावकारे, वंदना माळी, मीनाक्षी बिऱ्हाडे आणि संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील वर्ग-४ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरल्यास विद्यमान कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन रुग्णसेवा अधिक प्रभावी व दर्जेदार होईल, अशी अपेक्षा कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे.



