Home क्राईम अनैतिक संबंधाच्या वादातून मित्राचा खून ; २४ तासांत दोन आरोपींना अटक

अनैतिक संबंधाच्या वादातून मित्राचा खून ; २४ तासांत दोन आरोपींना अटक

0
1

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात अनैतिक संबंधाच्या वादातून एका तरुणाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐनपूर येथील शेख कुरबान शेख शब्बीर (वय ३०) यांचा मित्रांनीच कट रचून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐनपूर येथील शेख कुरबान शेख शब्बीर हे ९ जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होते. ११ जुलै रोजी त्यांचा मृतदेह नांदूरखेडा शिवारातील विनायक काशिनाथ पाटील यांच्या गट क्रमांक ९६ मधील कपाशीच्या शेतात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात हाताने गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयित गणेश संजय घोरपडे (रा. रावेर रेल्वे स्टेशन) याच्यावर लक्ष केंद्रित केले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गणेश घोरपडे याचे मयत कुरबान यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये कुरबान यांनी दोघांना ऐनपूर येथे रंगेहात पकडले होते. त्यावेळी गणेशला मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा राग मनात धरून गणेशने कुरबानला “आमच्या संबंधात अडथळा आणलास तर तुला जिवे ठार मारीन,” अशी धमकी दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले. यानंतर ९ जुलैच्या रात्री गणेश घोरपडे व मेघराज वसंत सांगळे यांनी कुरबान याला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे दोघांनी मिळून त्याचा हाताने गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून फरार झाले. या प्रकरणी मयताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गणेश संजय घोरपडे व मेघराज वसंत सांगळे या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. तसेच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, मुख्य आरोपी गणेश घोरपडे हा गुन्ह्यानंतर मध्य प्रदेशात फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार व त्यांच्या पथकाने पहाटे विशेष शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेत रावेर येथे आणले. दुसरा आरोपी मेघराज सांगळे यालाही अटक करण्यात आली असून दोघांकडून पुढील चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.


Protected Content

Play sound