Home Cities जळगाव पोलीस दलातर्फे तब्बल २.१६ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत 

पोलीस दलातर्फे तब्बल २.१६ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत 

0
114


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाने गुन्ह्यांचा छडा लावत चोरी, घरफोडी, फसवणूक आणि इतर मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांतील तब्बल २ कोटी १६ लाख ८४ हजार ९३० रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करून उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांचा हरविलेला अथवा चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्याने पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

११ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या ‘मुद्देमाल हस्तांतरण मोहिमे’ अंतर्गत विविध गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला. हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस दलाने सन २०२६ मध्ये मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात विशेष भर देत मोठ्या प्रमाणावर चोरीस गेलेला आणि हरविलेला मुद्देमाल शोधून काढला. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे, नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि चोरीस गेलेली संपत्ती शक्य तितक्या लवकर मूळ मालकांच्या ताब्यात देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. जळगाव परिमंडळातील विविध पोलीस ठाण्यांनी उत्कृष्ट तपास करून ७३ लाख ५२ हजार २०८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यात ८४ मोबाईल फोन, ३०८.७३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १८५.४६ भार चांदी, १ लाख ९५ हजार रुपयांची रोख रक्कम, २१ मोटारसायकली, एक चारचाकी वाहन, एक रिक्षा तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

चाळीसगाव परिमंडळानेही उल्लेखनीय कामगिरी करत १ कोटी १६ लाख १६ हजार २२२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या मुद्देमालात ३३३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ९७ भार चांदी, २४ लाख ६८ हजार ६६० रुपयांची रोख रक्कम, ७५ मोबाईल फोन, १५ मोटारसायकली, दोन चारचाकी वाहने, तीन बँक खाती आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. जळगाव जिल्हा सायबर पोलीस स्टेशनने तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करून हरविलेले आणि विविध प्रकरणांतील २०७ मोबाईल फोन शोधून काढले. २७ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीचे हे मोबाईल संबंधित नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत करण्यात आले. सायबर गुन्ह्यांच्या तपासातील या यशामुळे पीडित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सायबर पोलिसांवरील विश्वासही वाढला आहे.

या कार्यक्रमात उत्कृष्ट तपास, न्यायालयीन यश आणि विशेष कामगिरी करणाऱ्या तपास अधिकारी, सरकारी अभियोक्ता, फॉरेन्सिक अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. खून, बलात्कार, पॉक्सो, एटीएम चोरी, अज्ञात मृतदेहांची ओळख, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि इतर गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये वैज्ञानिक पुरावे, फॉरेन्सिक तपास, डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही विश्लेषणाच्या साहाय्याने आरोपींना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळवून देण्यात पोलीस दलाला यश आले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करत कोणताही गुन्हा किंवा संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. नागरिकांचे सहकार्य, वेळेवर मिळणारी माहिती आणि पोलीस-जनतेतील समन्वय यामुळे गुन्ह्यांचा उलगडा अधिक प्रभावीपणे होतो, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीचे संरक्षण करणे ही पोलीस दलाची सर्वोच्च जबाबदारी असून, नागरिकाभिमुख आणि पारदर्शक पोलीसिंगसाठी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound