Home क्राईम यावल-फैजपूर महामार्गावर भीषण अपघात; आयशर पलटी होऊन २५ मजूर जखमी

यावल-फैजपूर महामार्गावर भीषण अपघात; आयशर पलटी होऊन २५ मजूर जखमी

0
20


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल-फैजपूर महामार्गावरील सांगवी-हिंगोणा गावांदरम्यान सोमवारी (६ जुलै) सकाळी भीषण अपघात घडला. शेतमजुरीसाठी जात असलेल्या आयशर वाहनाचा पुढील टायर अचानक फुटल्याने वाहन पलटी होऊन त्यातील तब्बल २५ आदिवासी मजूर जखमी झाले. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहन चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा परिसरातील कुंड्यापाणी येथील आदिवासी मजूर सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता न्हावी परिसरातील शेतात कामासाठी आयशर (क्र. एमएच ४३ बीबी १२६४) या वाहनातून जात होते. यावल-फैजपूर महामार्गावरील सांगवी व हिंगोणा गावांच्या दरम्यान वाहनाचा पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि आयशर रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात वाहनातील २५ मजूर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींवर तातडीने उपचार सुरू केले. जखमींपैकी सुमारे १५ जणांच्या दुखापती गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. उर्वरित सुमारे १० जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

या अपघातातील जखमींमध्ये जगन पावरा, शहनाज तडवी, आसिफ तडवी, राधा पावरा, शितल पावरा, मेहंदी पावरा, खेमा पावरा, महिमा पावरा, मंगला पावरा, अनिता पावरा, विराज पावरा, नजरुद्दीन तडवी, मीना पावरा, विरूलाल पावरा, गिरा पावरा, सुनिता पावरा, वाकी पावरा, हुरी पावरा यांच्यासह अन्य मजुरांचा समावेश आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाच्या चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातानंतर यावल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.

या भीषण अपघातामुळे यावल-फैजपूर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मजुरांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound