


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या रावेर उत्तर मंडळ भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) अध्यक्षपदी प्रा. उमाकांत महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनात्मक कार्यातील सक्रियता, पक्षनिष्ठा आणि विविध अभियानांमधील प्रभावी योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रा. उमाकांत महाजन हे रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क निर्माण केला आहे. विशेषतः पंचायतराज विभागातील जबाबदारी पार पाडताना त्यांनी पक्षाच्या विविध जनसंपर्क आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. ‘गाव चलो अभियान’, ‘घर चलो अभियान’, ‘तिरंगा रॅली’ तसेच ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत जळगाव पूर्व भागातील प्रचार रथाचे नियोजन आणि अंमलबजावणी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी आपले संघटन कौशल्य सिद्ध केले आहे. याशिवाय मागील लोकसभा, विधानसभा तसेच सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्येही त्यांनी पक्षासाठी प्रभावी काम करत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
प्रा. महाजन यांच्या नियुक्तीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, आमदार नंदकिशोर (नंदूभाऊ) महाजन, आमदार अमोल जावळे, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, नगरसेवक पद्माकर महाजन, सूर्यकांत देशमुख तसेच रावेर मंडळाध्यक्ष रवी पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रावेर परिसरातही प्रा. उमाकांत महाजन यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असून युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ते प्रभावी नेतृत्व देतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आगामी काळात युवकांना पक्षाशी जोडणे, संघटन विस्तार आणि विविध जनहिताच्या उपक्रमांना गती देण्यावर भर दिला जाणार असल्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.



