Home Cities जळगाव जळगाव दाणाबाजारातील बेशिस्त पार्किंगवर वाहतूक शाखेची कारवाई ; व्यापारी व ट्रान्सपोर्ट धारकांना कायदेशीर...

जळगाव दाणाबाजारातील बेशिस्त पार्किंगवर वाहतूक शाखेची कारवाई ; व्यापारी व ट्रान्सपोर्ट धारकांना कायदेशीर नोटीस

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरात वाढणारी वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कठोर पावले उचलली आहेत. दाणाबाजार परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि ट्रान्सपोर्ट धारकांना सार्वजनिक रस्त्यावर विनाकारण अवजड वाहने उभी न करण्याबाबत अधिकृत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी ही नोटीस जारी केली असून, मोटार वाहन कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दाणाबाजार हा जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेला व्यावसायिक परिसर असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक होत असते. या परिसरात मालाची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तसेच रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच माल चढ-उतार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट धारकांकडून दुकानांसमोर किंवा आस्थापनांसमोर ट्रक, टेम्पो यांसारखी अवजड वाहने दिवसभर विनाकारण उभी ठेवली जात असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे वाहने उभी करणे हे मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२२ चे उल्लंघन असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी केल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहन चालक, पादचारी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. वाहतूक शाखेने व्यापारी व वाहनधारकांना मालाची चढ-उतार करताना वाहन जास्तीत जास्त ३० ते ४५ मिनिटांपर्यंतच उभे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित वाहन तात्काळ शहराबाहेरील निर्धारित पार्किंग क्षेत्रात हलविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यांचा वापर कोणत्याही परिस्थितीत खासगी पार्किंग किंवा गोदामासारखा करता येणार नसल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्यावरील जागेचा व्यावसायिक कारणांसाठी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वापर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने टोईंग करून जप्त केली जातील आणि त्याचा संपूर्ण खर्च वाहन मालकाकडून वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नोटीस मिळाल्यानंतर नियमांचे पालन न केल्यास संबंधित वाहनधारक आणि व्यावसायिक आस्थापनांविरोधात दंडात्मक तसेच जप्तीची कारवाई करण्यात येईल. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. दाणाबाजारातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून, व्यापारी व वाहनधारकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे. जळगाव शहर वाहतूक शाखेने दाणाबाजार परिसरातील अवैध पार्किंग आणि रस्त्यावरील अडथळ्यांविरोधात कठोर भूमिका घेत व्यापारी व ट्रान्सपोर्ट धारकांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि जप्तीची कारवाई होणार आहे.


Protected Content

Play sound