


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत वाहन पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी थेट पोलीस प्रशासनाला पत्र लिहून दोषी वाहनधारक आणि व्यावसायिक मालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या धडक पत्रव्यवहारामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
जळगाव शहरातील जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (नवीन राष्ट्रीय महामार्ग ५३) हा नव्याने तयार करण्यात आला असून, या मुख्य महामार्गाला लागूनच नागरिकांच्या सोयीसाठी समांतर रस्ते विकसित करण्यात आले आहेत. मात्र, या समांतर रस्त्यांचा वापर सध्या वाहन पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. महापौरांनी या पत्रात प्रामुख्याने जनरल अरुणकुमार वैद्य चौक (आकाशवाणी चौक) ते खोटे नगर या दरम्यानच्या समांतर रस्त्यावरील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. या संपूर्ण मार्गावर दुतर्फा अनेक मोठी हॉटेल्स, शोरूम्स, हॉस्पिटल्स आणि विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू झाली आहेत. या व्यावसायिक ठिकाणी येणारे ग्राहक आणि नागरिक त्यांच्या गाड्या अधिकृत पार्किंगच्या जागेऐवजी थेट संपूर्ण समांतर रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे लावत आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, या भागात दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
या संदर्भात महापालिकेकडे आणि लोकप्रतिनिधींकडे जळगावच्या स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. समांतर रस्त्यांवर गाड्या पार्क केल्यामुळे रस्ता अरुंद होतो आणि वेगवान वाहनांमुळे येथे अपघातांचे प्रमाण देखील लक्षणीय वाढले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी वाहतूक पोलिसांना सूचित केले आहे की, या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि संभाव्य जीवघेणे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर अनाधिकृतपणे वाहने पार्क करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वाहतूक कोंडीला केवळ वाहनधारकच नव्हे, तर संबंधित व्यावसायिक देखील तितकेच जबाबदार असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या ज्या हॉटेल, शोरूम आणि हॉस्पिटल मालकांनी आपल्या ग्राहकांसाठी स्वतःच्या आवारात पार्किंगची व्यवस्था केलेली नाही, अशा सर्व संबंधित आस्थापनांच्या मालकांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी शहर वाहतूक शाखेला दिले आहेत. पोलिसांकडून आता या मार्गावर विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालक आणि पार्किंगचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मॉल व शोरूम चालकांना दट्ट्या दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



