Home प्रशासन नागझिरी नदीतील गाळामुळे पूल धोक्याच्या उंबरठ्यावर ; रावेर शहरात पूरस्थितीचा धोका वाढला

नागझिरी नदीतील गाळामुळे पूल धोक्याच्या उंबरठ्यावर ; रावेर शहरात पूरस्थितीचा धोका वाढला

0
16


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातून वाहणाऱ्या नागझिरी नदीतील गाळ मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे नदीपात्राची खोली अत्यंत कमी झाली असून पूल आणि नदीतळ यातील अंतर केवळ काही मीटर इतकेच राहिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

यावर्षी नागझिरी नदीच्या साफसफाई आणि गाळ काढण्याच्या कामांसाठी नगरपालिकेने सुमारे ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र प्रत्यक्ष कामांच्या अंमलबजावणीत दिरंगाई झाल्यामुळे नदीपात्राची अवस्था सुधारण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. संभाजी चौक, पंचशील चौक आणि सावदा रोड पुल परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह संकुचित झाला असून पावसाळ्यात पाण्याचा वेग वाढल्यास ते थेट पुलांवरून व आसपासच्या वसाहतींमध्ये शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

नदी संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, नदीतील गाळ नियमितपणे काढणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा नदीची नैसर्गिक वहन क्षमता कमी होते आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. रावेर शहरात दरवर्षी या कामांवर मोठा खर्च होऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, पालिकेचे अनुभवी नगरसेवक पद्माकर महाजन यांनी नागझिरी नदी संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. निधीअभावी आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कामांमध्ये अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात प्लास्टिक, कचरा आणि इतर साहित्य नाल्यांमध्ये न टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, पालिकेने दर्जेदार कामांसाठी बाहेरील अनुभवी ठेकेदार नेमावेत, अशी मागणीही नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. कामे दर्जेदार झाल्यासच नागझिरी नदीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असे मत शहरात व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागझिरी नदीतील गाळाचा प्रश्न गंभीर बनला असून, योग्य उपाययोजना न झाल्यास रावेर शहरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिकच वाढण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound