
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावत यावल पोलिसांनी अपघाताचा बनाव करून केलेल्या खुनाचा पर्दाफाश केला आहे. पवन रविंद्र साळुंखे (वय २६, रा. कोळन्हावी, ता. यावल) याच्या खून प्रकरणात तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी रात्री उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी) यांनी पवन साळुंखे याचा मोटारसायकल अपघात झाल्याची माहिती देत त्याला ग्रामीण रुग्णालय, यावल येथे दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना घटनेबाबत संशय निर्माण झाला. डांभुर्णी शिवारातील किणगाव-डांभुर्णी रस्त्यावर रक्ताचे डाग तसेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर रक्तमिश्रित पुरावे आढळून आले. तसेच घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास केला असता पवन साळुंखे याचा अपघात नसून डोक्यात गंभीर दुखापत करून खून करण्यात आल्याचे समोर आले.
तपासात धक्कादायक बाब समोर आली की, आरोपींनी पवनचा खून करून त्याचा मृतदेह मोटारसायकलजवळ टाकला आणि अपघात झाल्याचा बनाव केला. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २८१, १२५(अ), १२५(ब), १३४(अ), १८४ तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात उमेश दिलीप परदेशी (वय ३२, व्यवसाय मजुरी), चेतन मोतीराम कोळी (वय ३२, व्यवसाय भाजीपाला विक्री) आणि लोकेश दिवाकर महाजन (वय ३२, रा. डांभुर्णी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना २५ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाघे, पोलीस कर्मचारी तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



