Home क्राईम घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक ; ४ लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक ; ४ लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरातील घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. घरकाम करणाऱ्या महिलेने साथीदाराच्या मदतीने दोन घरांमधून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी दोघांना अटक करून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मेहरूण तलाव परिसरातील लेकसाईड रेसिडेन्सी, गणेश घाटाजवळ राहणाऱ्या सौ. सुषा प्रभुनाथ कावरा (वय ५१, व्यवसाय-गृहिणी) यांनी १२ जून २०२६ रोजी घरातून सोन्याचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच त्यांच्या समोर राहणाऱ्या तेजल पियुष संचेती यांच्या घरातूनही सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे समोर आले होते.

फिर्यादी यांनी घरकामासाठी येणाऱ्या समताबाई राजपाल घांडेकर (वय ३९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा. धारणी, जि. अमरावती) हिच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला आवश्यक मार्गदर्शन करून तातडीने तपास करण्याचे आदेश दिले.

गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान घरकाम करणाऱ्या समताबाई धर्मराज धांडेकर हिने तिच्या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. तिच्या कबुलीनुसार तिचा साथीदार धर्मराज हरिसिंग मीना (वय २८, व्यवसाय- बांधकाम मजूर, रा. ग्राम पिपाराई, गंजबासोदा, श्यामाबाद, जि. विदिशा, मध्य प्रदेश) याचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ३ लाख ९ हजार रुपये किमतीचा २३.१० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस आणि ९१ हजार रुपये किमतीचे १६.४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बन (दागिने) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन राजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत सपोनि पाटील, गिरीश पाटील, किरण चौधरी, प्रमोद सांडवंजारी, विशाल चौधरी यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound