


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाने जळगाव शहर परिसरात आज पहाटेपासून सराईत गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्या आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींविरोधात विशेष धडक कारवाईला सुरुवात केली आहे. पहाटे सुमारे ४ वाजेपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आरसीपी (RCP) पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांकडून नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान संशयित तसेच सराईत गुन्हेगारांच्या निवासस्थानी पोलिसांकडून झडती घेण्यात येत आहे. यासोबतच विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत असून, वाहनांच्या कागदपत्रांची आणि मालकी हक्काची पडताळणी केली जात आहे. संशयास्पद किंवा मालकीबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसलेली वाहने पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात येत आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक व्यक्तींना पोलिसांकडून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात येत आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी करून इंट्रोगेशन फॉर्म भरले जात असून, आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धाक निर्माण झाला आहे.



