Home Cities अमळनेर ‘देऊळबंद २’च्या टीमने घेतले श्री मंगळग्रह देवाचे दर्शन

‘देऊळबंद २’च्या टीमने घेतले श्री मंगळग्रह देवाचे दर्शन

0
4

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “ते आले, त्यांनी पाहिले आणि येथील भक्तीभाव, शिस्त व नियोजनबद्ध व्यवस्थापनाने त्यांचे मन जिंकून घेतले…” अशी अनुभूती शुक्रवार, दि. १२ जून रोजी अमळनेर येथील अतिप्राचीन, अतिजागृत आणि अतिदुर्मिळ श्री मंगळग्रह मंदिरात पाहायला मिळाली. सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या ‘देऊळबंद २ आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे तसेच निर्माते कैलासबापू वाणी यांनी अमळनेरला भेट दिली. यावेळी त्यांनी श्री मंगळग्रह देवाचे अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.

अमळनेर येथील रहिवासी असलेले मित्र राजेश पांडे यांच्या आग्रहामुळे श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिल्याचे प्रवीण तरडे यांनी सांगितले. मंदिरातील अनुभव व्यक्त करताना ते भावूक झाले. “राजेश पांडे यांनी मला सांगितले होते की, अमळनेरला जाऊन आमच्या श्री मंगळग्रह देवतांचे दर्शन घेतले नाही, तर पुण्यात पाय ठेवू देणार नाही. त्यांच्या प्रेमापोटी आणि आग्रहामुळे आम्ही येथे आलो. मात्र मंदिरात आल्यानंतर येथील वातावरण, भक्तीभाव आणि व्यवस्थापन पाहून मन प्रसन्न झाले. येथे मला मानसिक शांतता मिळाली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

श्री मंगळग्रह मंदिरातील स्वच्छता, हिरवळ, सेवेकऱ्यांची शिस्त आणि व्यवस्थापनाची पद्धत यांचे प्रवीण तरडे यांनी विशेष कौतुक केले. मंदिरातील तरुण पुजाऱ्यांचा एकसारखा व नीटनेटका सोवळा, सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांचा शिस्तबद्ध पोशाख तसेच संपूर्ण परिसरातील स्वच्छता पाहून त्यांनी मंदिर विश्वस्त मंडळाचे अभिनंदन केले. स्वतः प्रवीण तरडे यांनी पारंपरिक सोवळे परिधान करून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेत मंदिरातील नियमांचे पालन केले.

निर्माते कैलासबापू वाणी यांनी यावेळी चित्रपटसृष्टीने सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प व्यक्त केला. ‘देऊळबंद २’ या चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नातील मोठा हिस्सा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. व्यावसायिक यशासोबत सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कैलासबापू वाणी यांनी पुढे सांगितले की, ‘देऊळबंद’ चित्रपट मालिकेचे एकूण ११ भाग येणार असून या सर्व भागांमध्ये प्रवीण तरडे यांचा सहभाग राहणार आहे. त्यांच्या या घोषणेचे मंदिर प्रशासन आणि उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

यावेळी श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने ‘देऊळबंद २’च्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. चित्रपटाच्या यशासाठी मंदिर प्रशासन, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविकांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, विश्वस्त डी. ए. सोनवणे, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, जयनील फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, सचिव वासू पाटील, अनुप गोरे, गजानन मालपुरे, लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष नितीन भदाणे, स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी जगदीश पाटील, महेश कोठावदे, मिंटू बारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘देऊळबंद २’च्या टीमच्या श्री मंगळग्रह मंदिर भेटीमुळे अमळनेरच्या धार्मिक पर्यटनाला आणि मंदिराच्या प्रसिद्धीला नवी ओळख मिळाली आहे. मंदिरातील भक्तीमय वातावरण, स्वच्छता आणि आदर्श व्यवस्थापनाने चित्रपट टीम प्रभावित झाली असून सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाच्या यशासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound