Home Cities जळगाव जळगावात सिंधी समाजाच्या १०५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पुज्य कंधकोट कश्मोर पंचायतीतर्फे सत्कार

जळगावात सिंधी समाजाच्या १०५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पुज्य कंधकोट कश्मोर पंचायतीतर्फे सत्कार

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील यशाचा टप्पा आणि त्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरवणाऱ्या परीक्षेतील गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावात एका भव्य कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘पुज्य कंधकोट कश्मोर पंचायत, जळगाव’ यांच्या वतीने रविवार, दिनांक ७ जून रोजी शहरातील गणेश नगर भागातील संत बाबा हरदासराम समाज मंदिर येथे १०५ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सभारंभ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या सोहळ्याला सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मार्गदर्शक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मंगलमयी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे पुज्य प्रेम प्रकाश मंदिराचे संत श्री. परसरामजी, पुज्य कंधकोट कश्मोर पंचायतीचे अध्यक्ष दिलीप कुमार मंधवाणी, सर्व कमिटी सदस्य आणि महिला समिती सदस्यांच्या उपस्थितीत झाली. मान्यवरांनी सर्वप्रथम श्री साईंच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून समारंभाचा अधिकृत प्रारंभ केला. या प्रसंगी संत श्री. परसरामजी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या आशीर्वचनातून मोलाचे मार्गदर्शन केले. सिंधी समाजातील मुलांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी मोठी भरारी घ्यावी, कठोर परिश्रम करून स्वतःचे व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी पंचायत दरवर्षी अशा प्रेरणादायी सत्कार समारंभाचे आयोजन करते, असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले. तसेच पालकांनीही आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाला नेहमी प्राधान्य द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.

या सत्कार सोहळ्यात एकूण २५० ते ३०० नागरिक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमात चहा-नाश्त्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टचे प्रतिनिधी आणि इतर सर्व सिंधी पंचायतींचे प्रमुख पदाधिकारी या सोहळ्याचे साक्षीदार बनले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री. दयानंद विसराणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी बाळगली पाहिजे. जिद्द आणि कष्टाला जर योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाली, तर जगात कोणतेही यश मिळवणे कठीण नाही. याच बळावर अनेक सामान्य विद्यार्थी यशाची मोठी शिखरे सर करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कार्यक्रमात उपस्थित मिस. सकिना सैफई मॅडम यांनीदेखील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करियरच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्स देऊन मार्गदर्शन केले.

या भव्य सोहळ्यात विविध शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, सी.ए., बी.टेक, बी.कॉम, बीबीए यांसारख्या व्यावसायिक पदव्या मिळवणारे २४ पदवीधारक (Degree Holders), तसेच १० वी चे ४८ विद्यार्थी आणि १२ वी चे ३३ विद्यार्थी अशा एकूण १०५ गुणवंतांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कारानंतर अनेक विद्यार्थी व पालकांनी भावूक होत पंचायतीचे मनापासून आभार मानले. हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंचायतीचे अध्यक्ष श्री. दिलीप कुमार मंधवाणी, उपाध्यक्ष श्री. राजकुमार कपूर, सचिव ओमप्रकाश सचदेव, सहसचिव संजय कुमार परप्यानी, सुंदरदास परप्यानी, शिक्षण समिती सल्लागार श्री. बालचंद कटपाल सर, कमिटी सदस्य नंदलाल जाधवानी, धनराज चावला, कमलकुमार हरवानी, मनोहर मेघवानी, राजकुमार मंधवानी, नारायणदास चावला आणि सन्माननीय पंचायत महिला समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound