Home क्राईम आमोदा येथे दुर्दैवी घटना ; टीव्ही डोक्यावर पडल्याने 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

आमोदा येथे दुर्दैवी घटना ; टीव्ही डोक्यावर पडल्याने 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

0
7


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आमोदा गावात रविवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. घरातील कपाटावर ठेवलेला दूरदर्शन संच (टीव्ही) अचानक डोक्यावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाजमीन मोहम्मद इसहाक पिंजारी (वय 13, रा. मस्जिदजवळ, आमोदा, ता. यावल) ही मुलगी रविवारी सकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास आपल्या घरी होती. त्यावेळी घरातील रिकाम्या कपाटावर ठेवलेला टीव्ही अचानक तिच्या डोक्यावर कोसळला. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने नाजमीन हिला उपचारासाठी भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी मुलीचे वडील मोहम्मद इसहाक इस्माईल पिंजारी (वय 38) यांनी यावल पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून प्रथम खबरी अहवाल तालुका दंडाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैयद यांच्या आदेशानुसार पुढील तपास सफौ/1329 मोती पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


Protected Content

Play sound