Home राष्ट्रीय NEET 2026 पेपर लीकच्या चर्चेला पुन्हा उधाण; सोशल मीडियावरील दाव्यांची सायबर विभागाकडून...

NEET 2026 पेपर लीकच्या चर्चेला पुन्हा उधाण; सोशल मीडियावरील दाव्यांची सायबर विभागाकडून चौकशी

0
8


नवी दिल्ली-वृत्तसेवा । NEET 2026 परीक्षेच्या कथित प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे या विषयाने पुन्हा वेग घेतला असून राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि सायबर यंत्रणांनी याची दखल घेतली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका वापरकर्त्याने काही टेलिग्राम चॅनेल्सवर NEET 2026 ची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा केला. संबंधित पोस्टमध्ये NTA आणि CyberDost या अधिकृत खात्यांना टॅग करण्यात आले होते. तसेच तीन टेलिग्राम चॅनेल्सच्या लिंकही शेअर करण्यात आल्या. हे चॅनेल्स एकाच व्यक्तीद्वारे चालवले जात असल्याचा आरोपही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

या दाव्यांची गंभीर दखल घेत NTA ने प्राथमिक प्रतिक्रिया दिली आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, संबंधित माहितीची पडताळणी करण्यासाठी आणि आवश्यक ती कारवाई करण्यासाठी प्रकरण सायबर गुन्हे विभागाकडे पाठविण्यात आले आहे. सध्या या दाव्यांची सत्यता तपासली जात असून अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, NEET UG 2026 परीक्षेच्या सुरक्षेबाबत आधीपासूनच चर्चा सुरू आहे. देशभरातील हजारो परीक्षा केंद्रांवर लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा दाव्यांमुळे संभ्रम वाढत असून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन संबंधित यंत्रणांकडून केले जात आहे.


Protected Content

Play sound