Home Cities अमळनेर कळमसरे ग्रामपंचायतीत सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात

कळमसरे ग्रामपंचायतीत सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात

0
8


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल ३५ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झालेल्या पाटील यांचा ग्रामस्थ, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना उपस्थितांना भावूक करून गेल्या.

कळमसरे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिलाबाई चौधरी, मिनाबाई कुंभार, दिनकर चव्हाण, देविदास बडगुजर, मंगल भिल, हेमंत चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी संघटना, विकास सोसायटीचे पदाधिकारी, महसूल विभागातील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी, पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांच्या पत्नी उषा पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कळमसरे ग्रामपंचायतीत नव्याने नियुक्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी नितीन भूपेंद्रसिंग पाटील यांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील होते. तर संघटनेचे सचिव नितीन पाटील आणि देविदास माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात ज्ञानेश्वर पाटील यांनी कळमसरे ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “संपूर्ण गावाने माझा जो भव्य सत्कार केला, ती माझ्या कामाची खरी पावती आहे. माझ्या ३५ वर्षांच्या सेवाकाळात अनेक ठिकाणी काम केले, मात्र एवढा सन्मान मला कुठेही मिळाला नव्हता. या प्रेमामुळे मी संपूर्ण गावाचा कायम ऋणी राहीन,” असे ते भावुक होत म्हणाले. अध्यक्षीय भाषणात संजय पाटील यांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, एखाद्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात सत्कार होणे ही दुर्मिळ बाब आहे. यावरून त्यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची आणि लोकांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानाची कल्पना येते.

कार्यक्रमात सचिव नितीन पाटील, ग्रामस्थ किसनसिंग राजपूत, निवृत्त प्राचार्य जे. वाय. कुंभार, दस्तगीर पिंजारी, उषा पाटील आणि नव्याने नियुक्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी नितीन भूपेंद्रसिंग पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व वक्त्यांनी ज्ञानेश्वर पाटील यांनी ज्या-ज्या गावात सेवा दिली त्या गावांच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील यांनी केले. भागवत कोळी, प्रदीप महाजन, योगेंद्र पाटील, गुलाब वडर, बुधा वडर तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound