
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील अवघ्या तीन महिन्यांच्या बालिकेचे प्राण वाचविण्यात जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या टीमला यश आले आहे. मेंदूला सूज येण्याच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या या शिशुला अत्यवस्थ अवस्थेत व्हेंटीलेटरवर दाखल करण्यात आले होते. मात्र, दहा दिवसांच्या अथक उपचारांनंतर तिला नवजीवन मिळाले असून सध्या तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.

अमळनेर येथील मोनीस हारून शेख यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला काही दिवसांपासून तीव्र ताप येत होता. त्याचबरोबर तिला वारंवार झटके येऊ लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने धुळे येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तेथे तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने आणि अधिक प्रगत उपचारांची गरज भासल्याने बालिकेला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताच एनआयसीयू व पीआयसीयू विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी बालिकेची सखोल तपासणी सुरू केली. डॉ. सुयोग तन्नीरवार आणि डॉ. उमाकांत अणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीतील पाण्याची तपासणी, मेंदूचा एमआरआय तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती बालिकेला ‘एनसेफेलायटीस’ अर्थात मेंदूची सूज झाल्याचे निदान झाले.
यानंतर तातडीने उपचार पद्धतीत आवश्यक बदल करण्यात आले. डॉ. ओमश्री गुडे, डॉ. कुशल धांडे, डॉ. विशाल कोठावडे, डॉ. नवेद खान, डॉ. मिमोनी कुंभारे, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनवणे आणि डॉ. भारती झोपे यांच्या समन्वित टीमने सातत्याने बालिकेवर लक्ष ठेवून उपचार सुरू ठेवले. बालरोगतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांच्या प्रयत्नांना यश मिळत गेले आणि बालिकेची प्रकृती हळूहळू सुधारू लागली.
दहा दिवसांच्या अथक उपचारांनंतर बालिकेला व्हेंटीलेटरमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आणि अखेर ती पूर्णपणे धोक्याबाहेर आली. विशेष म्हणजे या बालिकेवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांवरील आर्थिक ताणही टळला. पीआयसीयू विभागातील हिरामण लांडगे यांनीही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विशेष सहकार्य केले.
याबाबत माहिती देताना डॉ. नवेद खान यांनी सांगितले की, “बालिका आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. तिला ताप, झटके आणि श्वसनाचा त्रास होता. आवश्यक तपासण्यांमधून एनसेफेलायटीसचे निदान झाल्यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. एनआयसीयू व पीआयसीयू विभागाच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालिकेची प्रकृती सुधारली आणि तिला नवजीवन देता आले. लहान मुलांमध्ये तापासोबत झटके किंवा असामान्य लक्षणे दिसल्यास पालकांनी त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.”



