Home Cities जळगाव अखेर सस्पेन्स संपला : नंदकिशोर महाजन यांना भाजपतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी !

अखेर सस्पेन्स संपला : नंदकिशोर महाजन यांना भाजपतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी !

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागांमधून निवडून देणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपचे रावेर क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाली असून ते सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर येथून कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी चुरस निर्माण झाली होती. यात शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर होते. यासोबत आमदार किशोर पाटील यांचे पुत्र नगरसेवक सुमीत पाटील यांचे नाव देखील चर्चेत आले.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक नावे चर्चेत होती. यात प्रामुख्याने नंदकिशोर महाजन, उद्योजक नंदू अडवाणी, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके, डॉ. केतकीताई पाटील, पाचोरा येथील पदाधिकारी अमोल शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर आदी नावांचा समावेश होता. तर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

या सर्व घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. यात नंदकिशोर महाजन यांनी बाजी मारली असून त्यांना भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे ते उद्या म्हणजेच सोमवार दिनांक एक जून रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नंदकिशोर महाजन यांनी भारतीय जनता पक्षासोबत निष्ठेने काम केल्याचे त्यांना फळ मिळाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसोबतच नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील जोरदार कामगिरी केली आहे. ते जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचे निकटवर्तीय असून पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असल्याने पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. तर, रात्रीच त्यांच्या तिकिटाचे संकेत मिळताच महाजन यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केल्याचे दिसून आले आहे.


Protected Content

Play sound