
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहर आणि तालुक्यातील सर्व बार व वाईन शॉपधारकांना जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष नोटीस बजावण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या उघड्यावरच्या मद्यपानावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याने शहरात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार मुक्ताईनगरमधील सर्व बार आणि वाईन शॉप चालकांना त्यांच्या दुकानाच्या परिसरात ग्राहकांकडून रस्त्यावर, मोकळ्या जागेत अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान होणार नाही, याची थेट जबाबदारी देण्यात आली आहे. दुकानासमोर किंवा परिसरात ग्राहकांना थांबण्यासाठी खुर्च्या, टेबल, पिण्याच्या पाण्याचे ग्लास, खाद्यपदार्थ किंवा इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.
यासोबतच प्रत्येक दुकानाबाहेर “येथे मद्यपान करण्यास मनाई आहे” असे स्पष्ट फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानाबाहेर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यपान करताना आढळल्यास संबंधित व्यक्तींना तत्काळ तेथून हटविणे आणि आवश्यक असल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश असल्याने बारधारक आणि वाईन शॉप चालकांमध्येही हालचाल वाढली आहे.
मुक्ताईनगरमध्ये काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मद्यपानामुळे नागरिक, महिला, लहान मुले आणि पादचाऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार पोहोचत होत्या. विशेषतः सायंकाळच्या वेळी काही भागांत निर्माण होणारी गैरसोय आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ही मोहीम हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.



