Home क्राईम पाचोऱ्यातील लॉजिंगमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला ; आत्महत्या की घातपात? नातेवाईकांचा...

पाचोऱ्यातील लॉजिंगमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला ; आत्महत्या की घातपात? नातेवाईकांचा संशय 


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये २५ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी, २८ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहेत. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असू शकतो, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र संजय मोरे (वय २५), रा. गिरड, ता. भडगाव हे पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये आढळून आले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर रविंद्र यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.

रविंद्र मोरे हे पाचोरा शहरातील भाजी मंडई परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये “मालक मेन्स वेअर” नावाचे रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवत होते. व्यवसायात मेहनती आणि शांत स्वभावाचा तरुण म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरापूर्वीच त्यांचा साखरपुडा त्यांच्या मामांच्या मुलीसोबत झाला होता. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

रविंद्र सर्वांशी मिळून-मिसळून राहणारा होता आणि त्याच्याकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाईल, यावर विश्वास बसत नसल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या मृत्यूमागे काहीतरी संशयास्पद घडले असावे, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पाचोरा पोलीस स्टेशन आणि ग्रामीण रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

रविंद्र यांच्या पश्चात वृद्ध आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी रविंद्र यांच्यावर होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील व्यापारी वर्ग आणि परिचितांनीही हळहळ व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound