Home Cities धरणगाव कृत्रिम दूध बनवण्याचा गोरखधंदा उघड ; २ हजार लीटर दूध जागेवर नष्ट...

कृत्रिम दूध बनवण्याचा गोरखधंदा उघड ; २ हजार लीटर दूध जागेवर नष्ट !

0
111

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भवरखेडा गावात रिफाइंड पोमोलीन तेलाचा गैरवापर करून आरोग्याला घातक ठरणारे भेसळयुक्त आणि कृत्रिम दूध तयार करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी दुपारी धाड टाकून हा गोरखधंदा उघडकीस आणला. याप्रकरणी सोमनाथ आंदन माळी (वय ३२, रा. भवरखेडा, ता. धरणगाव) या संशयित तरुणावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भवरखेडा येथे कृत्रिम दूध बनवले जात असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहआयुक्त सपकाळे, अन्न व सुरक्षा अधिकारी आकाश बारोडे, शरद पवार आणि किशोर साळुंखे यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी, २८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संशयित सोमनाथ माळी याच्या अड्ड्यावर अचानक छापा टाकला.

या कारवाईदरम्यान दुधातील फॅट (वसा) वाढविण्यासाठी रिफाइंड पोमोलीन तेलाचा सर्रास वापर केला जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने संशयित आरोपी सोमनाथ माळी याच्याकडून दुधात कशा प्रकारे भेसळ केली जाते आणि कृत्रिम दूध कसे बनवले जाते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील करून घेतले. हे भेसळयुक्त दूध कॅनमध्ये भरून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

२ हजार लीटर भेसळयुक्त दूध नष्ट :
अन्न सुरक्षा पथकाने कारवाई करत मानवी आरोग्यास घातक ठरणारे सुमारे २ हजार लीटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट केले. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून दूध बनवण्याचे साहित्य आणि रसायने जप्त केली आहेत.

लघुशंकेचा बहाणा करून आरोपी पसार :
पथकाची कारवाई सुरू असताना, संशयित आरोपी सोमनाथ माळी याने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला आणि अधिकाऱ्यांची नजर चुकवून तो घटनास्थळाहून पसार झाला. याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी आकाश बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे परिसरात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Protected Content

Play sound