Home Cities यावल दहिगावच्या एमएसएफ जवानाचा मृत्यू; आठवड्यात दुसऱ्या तरुणाच्या निधनाने गाव शोकसागरात

दहिगावच्या एमएसएफ जवानाचा मृत्यू; आठवड्यात दुसऱ्या तरुणाच्या निधनाने गाव शोकसागरात


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील दहिगाव येथील एका तरुण एमएसएफ जवानाचा चंद्रपूर येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विजय ओंकार काळे (वय ३४) असे मृत जवानाचे नाव असून, या घटनेमुळे दहिगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात गावातील दोन तरुणांच्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवासी असलेले विजय काळे हे मागील चार वर्षांपासून चंद्रपूर येथे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स (एमएसएफ) मध्ये कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास विजय काळे हे त्यांच्या दोन मित्रांसह चंद्रपूर येथील एका तलावात पोहण्यासाठी गेले होते.

तलावात पोहत असताना त्यांच्या दोन मित्रांना अडचण निर्माण झाल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी विजय काळे यांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ते स्वतःच तलावात बुडाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, दिनांक २७ रोजी पहाटे विजय काळे यांचा मृतदेह तलावातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. या प्रकरणी चंद्रपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

विजय काळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कर्त्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही या घटनेनंतर शोकमय वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

विशेष म्हणजे, दहिगाव गावात गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावकरी हादरले आहेत. सलग घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound