
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी आणि रविवार यामुळे दोन दिवस नामनिर्देशन पत्र स्वीकृती प्रक्रिया बंद राहणार असल्याने इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी याची विशेष नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता दि. १८ मे २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया दि. २५ मे २०२६ पासून सुरू झाली असून ती दि. १ जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. मात्र या कालावधीत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार दि. २८ मे २०२६ रोजी बकरी ईद निमित्त सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तसेच दि. ३१ मे २०२६ रोजी रविवार असल्याने या दोन्ही दिवशी निवडणूक विभागाकडून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून उर्वरित कार्यदिवसांमध्येच नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमधून होणाऱ्या या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या असून इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. आचारसंहितेमुळे प्रशासनही सतर्क झाले असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
निवडणूक विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे उमेदवार, राजकीय पक्ष आणि संबंधित प्रतिनिधींना नामनिर्देशनाच्या तारखा व सुट्ट्यांची माहिती काळजीपूर्वक लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आहे. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकृती होणार नसल्याने शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.



