Home आरोग्य एकच कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह!’;पत्रकार राहुल महाजन यांच्या तत्परतेमुळे गुजरातमध्ये थांबलेले दवाखान्याचे काम...

एकच कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह!’;पत्रकार राहुल महाजन यांच्या तत्परतेमुळे गुजरातमध्ये थांबलेले दवाखान्याचे काम मार्गी


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या लिहिणे नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणे आणि संकटसमयी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे होय, याचाच प्रत्यय नुकताच पाचोरा तालुक्यात आला आहे. तांत्रिक अडचणीमुळे गुजरातमध्ये थांबलेले एका रुग्णाचे तब्बल लाखो रुपयांचे ऑपरेशन, पाचोऱ्याचे पत्रकार राहुल महाजन आणि पत्रकार नंदकुमार शेलकर यांच्या एका कॉलमुळे तातडीने मदत मिळाली आहे. राहुल महाजन यांनी दाखवलेल्या या भावनिक आणि सामाजिक बांधिलकीचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

सामनेर येथील मनमिळाऊ आणि गरीब कुटुंबातील पत्रकार बाबूलाल पटेल यांच्या एका नातेवाईकाला गुरुवारी गंभीर आजारावरील ऑपरेशनसाठी गुजरात राज्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शस्त्रक्रियेचा खाजगी रुग्णालयात मोठा खर्च येणार होता मात्र आयुष्यमान भारत कार्ड मुळे त्यांना मदत होणार होती. परंतु कार्ड असूनही आयत्या वेळी तिथल्या रुग्णालयाने तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत हे कार्ड चालणार नसल्याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारचे हे कार्ड गुजरातमध्ये ‘इनव्हॅलिड’ (अवैध) दाखवत असल्यामुळे ऑपरेशन करण्यासाठी सर्व हालचाली थांबल्या होत्या. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे आणि अवाढव्य खर्चामुळे गरीब पटेल कुटुंब प्रचंड हताश झाले होते.

या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच सामनेरचे पत्रकार बाबूलाल पटेल यांनी तात्काळ पाचोऱ्याचे प्रसिद्ध पत्रकार राहुल महाजन आणि पत्रकार नंदकुमार शेलकर यांनी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राहुल महाजन यांनी एक क्षणही वाया न घालवता थेट आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि आयुष्मान भारत योजनेच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. आपल्याच राज्यातील आणि तालुक्यातील हे कुटुंब असून केवळ उदरनिर्वाहासाठी तिथे गेले आहे, तांत्रिक कारणास्तव एका गरिबाचे ऑपरेशन थांबू नये, अशी आग्रही आणि भावनिक विनंती राहुल महाजन यांनी प्रशासनाकडे केली.

राहुल महाजन यांच्या या सुसंवाद आणि वज्रमुठीच्या पाठपुराव्याला तातडीने यश आले. आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, त्या कार्डचे विरिफिकेशन करून दिले आणि काही वेळातच तांत्रिक अडचण पूर्णपणे दूर केली. यामुळे रुग्णालयाकडून थांबवण्यात आलेले ऑपरेशन वेळेत सुरू होऊ शकले असून रुग्णावर योग्य उपचार सुरू झाले आहेत. राहुल महाजन यांच्या एका फोन कॉलने पटेल कुटुंबासमोरील खूप मोठे संकट टळले.

बाबूलाल पटेल यांचे हे कुटुंब अत्यंत गरिबीतून पुढे आलेले आणि संपूर्ण परिसरात आपल्या मनमिळाऊ स्वभावासाठी परिचयाचे आहे. संकटसमयी देवदूतासारखे धावून आलेल्या पत्रकार राहुल महाजन आणि पत्रकार नंदकुमार शेलकर यांचे या संपूर्ण पटेल कुटुंबाने अत्यंत भावूक होऊन आभार मानले आहेत. आजच्या काळात जेव्हा पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर विविध प्रश्न उपस्थित केले जातात, अशा वेळी राहुल महाजन यांनी घेतलेली ही सकारात्मक आणि मदतीची भूमिका “एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह” चे उत्तम उदाहरण ठरली आहे. भावनिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारी हीच खरी आदर्श पत्रकारिता आहे, अशा भावना पाचोरा तालुक्यातून व्यक्त होत आहेत.

पाचोऱ्याचे पत्रकार राहुल महाजन आणि नंदकुमार शेलकर यांच्या तत्परतेमुळे गुजरातमध्ये तांत्रिक अडचणीत सापडलेल्या सामनेर येथील गरीब पटेल कुटुंबाच्या रुग्णाचे आयुष्मान भारत कार्ड तात्काळ सुरू झाले. एका फोन कॉलच्या माध्यमातून आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधून तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्याने लाखो रुपयांचे रखडलेले ऑपरेशन वेळेत मार्गी लागले असून, पत्रकारितेचा खरा संवेदनशील चेहरा या निमित्ताने समोर आला आहे.


Protected Content

Play sound