Home Cities जळगाव जळगावात ७ वाहनांद्वारे ‘हीट मॅपिंग’ ; उष्णतेवर मात करण्यासाठी मनपाचा मोठा उपक्रम

जळगावात ७ वाहनांद्वारे ‘हीट मॅपिंग’ ; उष्णतेवर मात करण्यासाठी मनपाचा मोठा उपक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाढत्या तापमानाचा आणि तीव्र होत चाललेल्या उन्हाच्या झळांचा सामना करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून शहरात ‘क्लायमेट ॲक्शन’ आणि ‘हीट ॲक्शन प्लान’साठी विशेष सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिका आणि अहमदाबाद येथील महिला हाउसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला. महानगरपालिका आवारातून सात वेगवेगळ्या दिशांना सर्वेक्षण वाहनांना हिरवा झेंडा दाखवत मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

उन्हाळ्याच्या काळात जळगाव शहरातील तापमान सातत्याने वाढत असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक आहे, कोणते भाग ‘हीट पॉकेट’ म्हणून ओळखले जातात आणि भविष्यात त्या भागांवर कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहराच्या हवामानाचा आणि तापमानाचा सखोल अभ्यास करून पुढील काळासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.

या सर्वेक्षणासाठी सात वाहनांद्वारे दोन टप्प्यांत ‘हीट मॅपिंग’ केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दुपारी १ ते ३ या वेळेत, म्हणजे दिवसातील सर्वाधिक तापमानाच्या काळात शहरातील विविध भागांमधील तापमानाची नोंद केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात रात्री १० ते ११ या वेळेत तापमानातील बदलांची माहिती संकलित केली जाणार आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरक आणि उष्णतेचा प्रभाव अधिक अचूकपणे समजून घेण्यासाठी हे दोन टप्पे महत्त्वाचे मानले जात आहेत.

या संपूर्ण मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. शहरावरून जाणाऱ्या सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळणारा डेटा आणि प्रत्यक्ष वाहनांद्वारे गोळा होणारी माहिती एका विशेष मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंदवली जाणार आहे. या माध्यमातून शहरातील विविध भागांचा अचूक तापमान आलेख तयार होणार असून त्यावर आधारित भविष्यातील नियोजन करण्यात येणार आहे. हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे.

या मोहिमेसाठी अहमदाबाद येथील महिला हाउसिंग ट्रस्टची तज्ज्ञ टीम जळगावात दाखल झाली असून त्यांनी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आशा सेविकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. सर्वेक्षण, माहिती संकलन आणि नागरिकांशी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तळागाळातील अचूक माहिती उपलब्ध व्हावी आणि स्थानिक परिस्थितीची योग्य नोंद व्हावी, यासाठी आशा सेविकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे.

महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या भागांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक आढळून येईल, त्या भागांमध्ये भविष्यात विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, झोपडपट्टी व पत्र्यांच्या घरांवर उष्णता कमी करणारा पांढरा रंग लावणे, सार्वजनिक ठिकाणी सावलीची व्यवस्था आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी जनजागृती अशा विविध उपाययोजनांचा समावेश असणार आहे.

ही संपूर्ण मोहीम महानगरपालिकेच्या उपायुक्त शोभा बाविस्कर आणि पर्यावरण विभागाचे अभियंता प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून महिला हाउसिंग ट्रस्टची तज्ज्ञ टीम आणि मनपाचे कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत. जळगाव शहराला वाढत्या तापमानाच्या संकटापासून वाचवण्यासाठी आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


Protected Content

Play sound