Home क्राईम बदनामीची भीती दाखवून तरुणीकडून एक लाखांची खंडणी ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

बदनामीची भीती दाखवून तरुणीकडून एक लाखांची खंडणी ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियाचा गैरवापर करून एका १९ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करणे, तिचा विनयभंग करणे आणि तिच्याकडून पैशांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निलेश हिरामण मराठे (रा. आसोदा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी तरूणी ही जळगावात कॉलेजला येत-जात असताना मागील सुमारे एक वर्षापासून संशयित आरोपी निलेश मराठे याने तिच्याशी ओळख वाढवली. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीचे फोटो मिळवले आणि तिच्यासोबत झालेल्या संवादाचे कॉल रेकॉर्डिंग केले. यानंतर आरोपीने त्याचे खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. हे फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग पीडितेच्या आई-वडिलांना तसेच इतर लोकांना सोशल मीडियावर पाठवून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. एवढेच नव्हे तर तरुणीला आणि तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

बदनामीच्या आणि जीवे मारण्याच्या भीतीपोटी पीडितेने मागील वर्षभरात संशयिताला वेळोवेळी तब्बल १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात दिली. मात्र, आरोपीची हाव एवढ्यावरच थांबली नाही. त्याने पुन्हा संपर्क साधून आणखी २५ हजार रुपयांची मागणी करत पीडितेचा मानसिक छळ सुरू ठेवला. अखेर या असह्य त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने हिंमत दाखवत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound