मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या ३५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. अचानक फिट्स (झटका) आल्याने युवकाचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे उचंदा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश शांताराम कटोणे (बेलदार) हे रविवारी दुपारी जुने उचंदा गावाजवळील पूर्णा नदीत मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत असताना अचानक त्यांना फिट्स आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह आणि अचानक घडलेल्या प्रकारामुळे त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने युवकाला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे हलविण्यात आला.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राजकुमार चव्हाण करीत आहेत. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश कटोणे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांची ओळख होती. या घटनेमुळे नदी-नाल्यांमध्ये मासेमारी करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.



